श्री मौनी महाराज हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज पाटगांव आपले सहर्ष स्वागत करत आहे...

Wednesday, June 17, 2020

लेखसंग्रह

श्री मौनी महाराज हायस्कूल पाटगांव 
जांभूळ 
कोकणातील "रानमेव्याला"  परदेशवारी घडविणाऱ्या छाया भिडे

कोकणातील रानमेवा समजल्या जाणाऱ्या जांभूळ या फळाला परदेशवारी घडवली आहे ती छाया उदय भिडे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या गावातील छाया भिडे यांनी या जांभळाना फक्त परदेशवारीच घडवली नाही, तर स्थानिकांना रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला आहे. छाया भिडे या जांभूळ या फळाची पोळी तयार करुन बाजारपेठेत विकतात.

पूर्णतः नैसर्गिक असलेली ही जांभूळपोळी भारतातील अनेक राज्यात विक्रीकरिता पाठवण्यात येते शिवाय तिने ऑस्ट्रेलियाची वारीदेखील केली आहे. या जांभूळपोळीला सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे

कोकणातील रानमेवा समजल्या जाणाऱ्या जांभूळ या फळाला परदेशवारी घडवली आहे ती छाया उदय भिडे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या गावातील छाया भिडे यांनी या जांभळाना फक्त परदेशवारीच घडवली नाही, तर स्थानिकांना रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला आहे. छाया भिडे या जांभूळ या फळाची पोळी तयार करुन बाजारपेठेत विकतात.

मधुमेह या रोगावर अतिशय गुणकारी असलेल्या या जांभूळपोळीला देशभरातून मागणी आहे. २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या व्यवसायाच्या इतिहासाबद्दल जांभूळ हे फळ मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे. जांभूळ फळ हे खरंच मधुमेहावर गुणकारी आहे. जांभूळ हे फळ हंगामी असल्याने त्यावर संशोधन करुन, वेगवेगळे प्रयोग करुन जांभूळपोळीची निर्मिती केली, जी बारमाही टिकू शकते.

कधीकधी जांभळांचे प्रमाण कमी असते, कधी जास्त असते, तसेच ती उन्हात सुकवण्यात येत असल्याने हवामानावरदेखील अवलंबून रहावे लागते, भिडे यांची ही सुमधूर जांभूळपोळी संपूर्णतः नैसर्गिक आहे. ती टिकवण्यासाठी तिच्यात कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यात येत नाही. तसेच जांभूळ सुकवण्यासाठीदेखील ड्रायर यंत्राचा वापर केला जात नाही. सुर्य़प्रकाशातच ती वाळवण्यात येतात. छाया भिडे यांच्या या व्यवसायामुळे कोकणातील या रानमेव्याला चांगला दर मिळू लागला आहे. पूर्वी अल्पदर मिळत असलेल्या जांभळांना आता भिडे कुटुंबीय २० ते २२ रुपये प्रतिकिलोने विकत घेतात. त्याशिवाय भिडे यांच्या या उद्योगामुळे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधीदेखील मिळाली आहे. हवाबंद पॅक केल्याने ही जांभूळपोळी वर्षभर टिकते.

सुरुवातीच्या काळात त्या स्वतःच जांभुळपोळी तयार करत होत्या. गावातील जांभळे गोळा करुन, ती स्वच्छ करुन त्याचा रस काढून ते पोळी तयार करुन सुकवेपर्यंत सर्व कामे माणसांद्वारे केली जात असत. सुरुवातीच्या काळात तर जांभळांचा रस मिक्सरवर काढण्यात येत होता, त्यामुळे या कामाला वेळ फार लागत असे. कालांतराने आम्ही एक यंत्र तयार करुन घेतले, ज्यावर जांभळांचा रस काढता येत होता आणि त्याची पोळी तयार करू लागलो, असे त्या सांगतात. सध्या ते देवरुख गावासोबतच शेजारील गावांमधील जांभळेदेखील विकत घेतात.

================================

                      पुलंचे आत्मचिंतन
============
भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा.

बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांनी तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करुया म्हणत बसले होते.

स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो. जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे काही जात, धर्म, पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात, दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात.

तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात. आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, बुद्ध, जैन, शीख- सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे.

एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात.

मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी, कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत. केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मेथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.

मनुष्यस्वभावात हा जात नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक विलक्षण कोडे आहे.

आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते. कामगार-चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील, असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही. त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-गिरण्यांतल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते.

खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसताहेत. ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’ अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे.

अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान घालताना दिसताहेत. खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.

आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर बुद्धिप्रामाण्य वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही. कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फेडतात.

आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय.

जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातेत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलिनांना उध्द्वस्त करण्यात येते. मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती, की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले फुले आणि कसले काय?

एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.

विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील.

धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.

पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरवल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.

संजय गांधीला बुद्ध आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुद्धीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.

त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरवणारे आणखी श्रेष्ठ.

सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात. कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात.

अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे.

पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.

माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती.

देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही.

ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे.

वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’.

मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही.

साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.

(’एक शुन्य मी’ या पुस्तकातून)

================================

*छत्रपती शिवाजी महाराज आणि नेपोलियन बोनापार्ट*

*फ्रेंच शोध पत्रकार फ्रँकॉईस गॉटिअर यांचे ऑनलाईन लाईव्ह व्याख्यान...*

शनिवार २० जून रात्री - १०.३० वाजता...

*शिवाजी महाराज अमेरिका परिवार यांच्या तर्फे आयोजन*

पुणे / लॉस एंजलिस :-  छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराज अमेरिका परिवार या संस्थेने शनिवार, २० जून २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.३० वाजता, प्रसिद्ध फ्रेंच लेखक,पत्रकार फ्रँकॉईस गॉटिअर यांचे ऑनलाईन लाईव्ह व्याख्यान आयोजित केले आहे. यामध्ये सुमारे ४८ देशांमधील आणि भारतातील २० राज्यांतील शिवप्रेमी सहभागी होणार आहेत.

व्याख्यानाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि नेपोलियन बोनापार्ट. गॉटिअर हा पॅरिस मधल्या नेपोलियन स्मारकाजवळ लहानाचा मोठा झाला. फ्रान्समधल्या  आघाडीच्या लूझिगारो या वर्तमानपत्रामध्ये त्याने तीस वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. कालांतराने तो जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला. तो अचंबित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र त्याने अभ्यासले तेव्हा त्याच्या लक्षात आले की इतिहासातील महाराजांचे योगदान अलेक्झांडर दि ग्रेट, ज्युलियस सिझर, नेपोलियन बोनापार्ट यांच्या तोडीसतोड  किंबहुना काकणभर  अधिक सरस आहे. तो अत्यंत भारावून गेला आणि त्याने पुण्यातच महाराजांचे एक भव्य स्मारक बांधले आहे.

जगभरातील विशेषत: युरोप-अमेरिकेतील जगविख्यात राजांबरोबर तुलना करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे असामान्य धैर्य, अतुलनीय साहस, अभूतपूर्व शौर्य, याच बरोबर सर्वां विषयीचा आदर, माता-भगिनी यांचा सन्मान, शत्रूच्यादेखील चांगल्या गुणांबद्दल आदर , त्यांची प्रशासन पद्धती, सर्व धर्मांविषयी आदर, इ. गोष्टी विलोभनीय आणि एकमेवाद्वितीय आहेत असे त्याच्या लक्षात आले.

शिवाजी महाराज अमेरिका परिवार ( SMAP - स्मॅप ) ही संस्था देखील शिवाजी महाराजांच्या असामान्य गुणांचा अमेरिकेमध्ये आणि भारताबाहेर संपूर्ण जगामध्ये प्रचार प्रसार व्हावा म्हणून  प्रयत्नशील आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर  ठेऊन संपूर्ण जगभर विविध क्षेत्रांतील बलशाली नेत्यांचे जाळे  तयार करणे, वैश्विक ऐक्य भावना जोपासणे, नवीन युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, संधी निर्माण करून देणे आणि विविध मार्गाने समाज सेवा करणे ही स्मॅपची मुख्य उद्दिष्टे आहेत. पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप सिंग, राजा कृष्णदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज, महाराजा रणजीत सिंग, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आणि इतर भारतीय राजे आणि समकालीन  जगातील राजे यांच्यातील सकारात्मक कर्तृत्वाचा अभ्यास करणे आणि संशोधन करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विजय पाटील या मूळच्या महाराष्ट्रातील आणि गेली पंचवीस वर्षे अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या व्यावसायिक तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार ही संस्था संस्थापन केली आहे. सध्या अमेरिकेमधील लॉस एंजलिस, अटलांटा, स्टॅन होसे, स्टॅनफोर्ड आणि ओमाहा येथे संस्थेच्या शाखा आहेत. लवकरच लंडन, पॅरिस , युरोप, आखाती देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आशिया , आफ्रिका तसेच महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यात शाखा स्थापन  करण्यात येणार आहेत. प्रा. क्षितिज पाटुकले पुणे  हे स्मॅपसाठी संघटक म्हणून काम पहात आहेत.

जागतिक नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व आणि कर्तृत्व प्रस्थापित करणे हे स्मॅप संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिवाजी महाराज अमेरिका परिवार या संस्थेविषयी  अधिक माहितीसाठी कृपया www.smapfoundation.org या संकेतस्थळाला भेट द्या.

जॉईन होण्यासाठी लिंक :- www.edupandhari.blogspot.com

================================

                             साने गुरुजी 
                     मातृह्रदयी की लढवय्ये!
              महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी यांचा 11 जूनला स्मृतीदिन आहे. साने गुरुजी यांनी लिहीलेल्या *"शामची आई"* या पुस्तकाने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. संस्कारगाथा अस या पुस्तकाच वर्णन करता येईल. कोवळ्या वयातील मुली-मुलांच्या मनात पालकांच्याबद्दल आदरभाव बाळगण्याचे, जातीआधारित अहंकार सोडून देण्याचे, श्रमाची प्रतिष्ठा राखण्याचे, निसर्गाविषयी कृतज्ञभाव जपण्याचे आवश्यक संस्कार या पुस्तकाने रुजवले आहे. एकुणातच समंजस आणि उदारमतवादी नागरिकत्व घडण्यास हे पुस्तक उपयोगी ठरलेले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. या पुस्तकामुळेच साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा ठसठशीत बनली.
           *आंतरभारतीचे* स्वप्न उपस्थितांना समजावून सांगताना साने गुरुजी एकदा म्हणाले होते, माणसाच्या पायात काटा टोचल्यानंतर त्याची वेदना मेंदुमधे जाणवते, डोळ्यातील अश्रुवाटे ती वेदना व्यक्त होते आणि पायातील काटा काढण्यासाठी हात पुढे सरसावतात. पाय, हात, डोळे, मेंदू हे अवयव वेगवेगळे असले तरी वेदनेच्या प्रसंगात ते सर्वजण एकत्र येऊन वेदना सुसह्य करण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी एकोप्याने कृती करतात. त्याचप्रमाणे आपण भारतीय वेगवेगळी भाषा बोलणारे असूत किंवा वेगवेगळी श्रद्धा बाळगणारे असूत आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. एकमेकाच्या अडीअडचणीला उभे राहिले पाहिजे. साने गुरुजींच्या अशा भावनाशील बोलण्याने, लिखाणाने आणि कृतीने साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा आणखी ठसठशीत बनली. साने गुरुजींच्या मृत्युनंतर आपण त्यांची हीच मातृह्रदयी प्रतिमा सतत प्रसारित केली. अस म्हणतात की कोणत्याही महान व्यक्तीमत्वाचे अनुयायी त्या महान व्यक्तीच्या जीवन कार्यातील आपल्याला झेपेल आणि रुचेल तेवढाच भाग स्विकारतात आणि तेवढाच भाग सतत सांगत रहातात. साने गुरुजींच्याबद्दलही काहीस असच झाल आहे का? सामाजिक सलोखा आणि परस्पर आदरभाव रुजवण्यासाठी साने गुरुजींनी केलेले कार्य महान आहेच पण साने गुरुजींच जिवितकार्य एवढ्यापुरतच मर्यादित नाही. अन्यायाविरुद्ध बोलायला, भूमिका घ्यायला आणि कृती करायला शिकवण हा सुद्धा एक आवश्यक संस्कार असतो. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची लढवय्या वृत्ती साने गुरुजींच्यामधे होती की नव्हती? असेल तर ती पुढे का येत नाही? आधी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याला पचतील, रुचतील तेवढेच साने गुरुजी स्विकारल्यामुळे अस झाल असेल का?

*चले जाव आंदोलनातील साने गुरुजी :*
ब्रिटीशांच्या साम्राज्यवादी जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली निर्णायक आंदोलन छेडले गेले. या आंदोलनाच्या ठरावात ब्रिटीशांना *"छोडो भारत"* असे बजावण्यात आले होते तर हे घडवून आणण्यासाठी भारतीयांसाठी *"करा अथवा मरा"* चा आदेश होता. साने गुरुजींनी बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली. भूमिगत राहून ब्रिटीशांच्या विरोधात रान उठवण्याचे काम ते आणि त्यांचे सहकारी करत होते. आपल्या ओजस्वी वाणीने ब्रिटीश राजवटीविरोधात युवती-युवकांच्या मनात अंगार फुलविण्याचे काम साने गुरुजी करत होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक युवती- युवकांनी चले जाव आंदोलनात स्वतःला झोकून दिले. या आंदोलनादरम्यान साने गुरुजींनी *"क्रांतीच्या वाटेवर"* ही पुस्तिका लिहीली. बरेच दिवस ही पुस्तिका अप्रकाशित होती. काही वर्षांपुर्वी साधना प्रकाशनाने विशेषांक स्वरुपात ही पुस्तिका प्रकाशित केली. हिंसा-अहिंसा याबद्दलचे आपल्या मनातील विचार साने गुरुजींनी या पुस्तिकेत शब्दबध्द केले आहेत. ब्रिटीश राजवटीविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन तरुणी-तरुणांना करताना या पुस्तिकेत साने गुरुजींनी जे लिहीलय त्याचा थोडक्यात आशय असा आहे. काँग्रेस वर्कींग कमीटीच्या ८ अॉगस्ट १९४२ च्या ठरावाद्वारे भारतीयांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले आहे. प्रत्येक भारतीयाने उद्यापासून स्वतःला स्वतंत्र नागरिक मानावे व तसा व्यवहार करावा असे मार्गदर्शन म. गांधीजींनी केले आहे. या ठरावानुसार आज भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारतीय भुमीवरील ब्रिटीश राजवट ही परकीय राजवट ठरते.  परकीय राजवटीला भारतीय भूमीवरुन घालवून देण्यासाठी आपण जे करत आहोत ते एक प्रकारचे युद्धच ठरते. मानवी जीवन अनमोल आहे. या युध्दात होता होईल तो जिवीतहानी टाळण्याचाच आपला प्रयत्न असायला हवा आणि तो राहीलच पण परकीय सत्तेविरुद्धच्या युद्धात हिंसा-अहिंसेची चर्चा अप्रस्तुत ठरते. साने गुरुजींच्या या भुमिकेबद्दल चर्चा होऊ शकते. पण बेचाळीसच्या चले जाव आंदोलनातील सहभागातून साने गुरुजींच्यामधील जो लढाऊ देशभक्त आपल्यासमोर येतो तो आपण समजून घेत आहोत का? इतरांना समजावून सांगतो का, हा खरा प्रश्न आहे. पुढे चले जाव आंदोलनात साने गुरुजींना अटक झाली. धुळे आणि नाशिक येथील कारागृहात त्यांना ठेवले होते. आंदोलनात सहभागी असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगावीत म्हणून ब्रिटीश पोलीसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. हा मार सहन करण्याची प्रेरणा शामच्या आईच्या आठवणीतूनच साने गुरुजींना मिळाली असणार. त्यांनी मारहाण सहन केली मात्र आपल्या एकाही सहकाऱ्याचे नाव त्यांनी स्वतःच्या तोंडातून बाहेर पडू दिले नाही. मातृह्रदयी साने गुरुजींचा अशा प्रसंगातला निर्धारही तितकाच कणखर होता.

*शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण :*
साने गुरुजींच्यामधील संघटन कौशल्य खऱ्या अर्थाने नजरेत भरले ते काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाच्या वेळी. ग्रामीण भागात होत असलेल्या काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी साने गुरुजींच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक दल उभारले होते. यातूनच राष्ट्र सेवा दलाची संकल्पना पुढे आली. ग्रामीण भागात होत असलेल्या या अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भारताचे विविध प्रश्न काँग्रेसच्या अजेंड्यावर आणण्यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले. शेतकरी व कामकरी समुहांनी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे याकरिता गुरुजींनी खानदेश आणि लगतचा नाशिकपर्यंतचा भाग पिंजून काढला.
*आता उठवू सारे रान,*
*आता पेटवू सारे रान,*
*शेतकऱ्यांच्या राज्यासाठी,*
*कामकऱ्यांच्या राज्यासाठी,*
*लावू पणाला प्राण!*
         हे गाण गुरुजींनी याच काळात आणि याच कारणासाठी लिहीलेल आहे. भारतातला शेतकरी आज अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. शेतीउद्योग प्रचंड जोखमीचा बनलाय. अशावेळी साने गुरुजींच्या या गाण्याने साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुली-मुलांनी प्रेरणा घ्यायला हवी. शासनाची शेती आणि शेतकरीविरोधी धोरणे बदलवण्यासाठी गुरुजींचे हे गाणे पुन्हा एकदा या देशातील तरुणी आणि तरुणांच्या ओठावर यायला हवे.

*प्रताप मिलच्या कामगारांचा लढा :*
अंमळनेर येथील प्रताप मिलच्या कामगारांचा संप साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म. गांधीजींचे शिष्य असणारे साने गुरुजी गांधीजींच्याच भाषेत म्हणाले, कारखानदारांनी, विश्वस्तवृत्तीने वागले पाहिजे. उत्पादनात कामगारांच्या घामाचाही हिस्सा असतोच. कामगाराला आणि कामगारांच्या घरच्यांना सुखाने जगता येईल एवढा त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. संपकरी कामगारांसमोर बोलताना साने गुरुजींनी कामगारांच्या घामाची चोरी आणि कारखाना मालकाची लोभी वृत्ती याबाबत टिकास्त्र सोडले होते. हा संप यशस्वी झाला आणि प्रताप मिलच्या कामगारांना न्याय मिळाला. आज कामगार कायदे कमकुवत केले जात आहेत. काॕन्ट्रॕक्ट लेबर नावाच्या राक्षसान कामगारांच्या न्याय्य अधिकारांना सुरुंग लावलाय. कोरोनानिमीत्ताने आलेल्या लॉकडाऊनमुळे कष्टकरी मजुरांचे अतोनात हाल झाले. व्यवस्था म्हणून आपल्याला सर्वांनाच आपली लाज वाटावी इतकी मजूरशक्तीची झालेली परवड जगाने पाहिली. तळात दडपलेल विषमतेच भयाण वास्तव कोरोनाच्या निमीत्ताने पृष्ठभागावर आल. अशावेळी कामगारांच्या घामाची चोरी होऊ न देण्यासाठी, त्यांना सन्मानाने व समाधानाने जगता याव यासाठी संविधानाच्या, कायद्याच्या कक्षेत राहून आपापल्या परीने काहीना काही कृती करण्याच बळ साने गुरुजींच्या स्मृतीतून आपल्याला मिळायला हव.

*पंढरपूर मंदीर प्रवेश सत्याग्रह :*
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी केलेले प्राणांतिक उपोषण हा त्यांच्या जिवीतकार्यातील महत्वाचा टप्पा आहे. जन्माधिष्ठीत उच्च-निचतेवर आधारित चातुर्वण्य व्यवस्थेतील अन्याय व शोषण हा कुठल्याही संवेदनशील व समताप्रेमी माणसाला अस्वस्थ करणारा विषय. साने गुरुजींसारख्या भावूक आणि प्रेमाच्या शक्तीवर विश्वास असणाऱ्या व्यक्तीने अशा मुद्द्यासाठी आपले प्राण पणाला लावायचा निर्धार करावा हे सुसंगतच मानले पाहिजे. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा हा वाद जोरात होता. म.  गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात या दोन्ही आघाड्यावरील कार्यक्रम व उपक्रमांची अशी काही सांगड घातली की तो वादच अप्रस्तुत ठरला. साने गुरुजी आणि त्यांचे समाजवादी सहकारी गांधीजींच्याच मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते. बेचाळीसच्या लढ्याची धामधुम कमी होताच आणि भारताचे राजकीय स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच गुरुजींनी सामाजिक समतेच्या लढ्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा महत्वाचा सत्याग्रह हातात घेतला. यासाठी वर्षभर राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासह महाराष्ट्राचा दौरा करुन महाराष्ट्राच्या समाजमनाला साद घातली. कलापथकाच्या प्रबोधनामुळे अनेकांची पारंपारिक भूमिका बदलली. काही थोडे जण मात्र अधिक कर्मठ बनले. साने गुरुजींनी पंढरपुरच्या वाळवंटात प्राणांतिक उपोषण सुरु केले.
*विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,*
*भेदाभेद भ्रम अमंगळ!*
या संत तुकारामांच्या भुमिकेची आठवण सर्वांना आणि विशेषतः विरोध करणाऱ्या बडव्यांना या सत्याग्रहाने करुन दिली. पंढरीचा विठ्ठल हे बहुजनांचे दैवत. *समतेचा पुकारा करणाऱ्या बौद्ध परंपरेशी नाते सांगणारा हा देव.* पूरोहितशाहीच्या उपजिविकेचा आधार म्हणून रुजवलेल्या कुठल्याही निरर्थक कर्मकांडाला वारकरी परंपरेत थारा नाही. भक्तांच्याकडून केवळ नामस्मरणाची अपेक्षा सांगणाऱ्या परंपरेतील हा देव, आपल काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या भक्ताला आपल्या कामातच पांडुरंग भेटेल अस आश्वस्त करणाऱ्या परंपरेतील देव. अशा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात केवळ जातीच्या आधारावर काही जणांना प्रवेश नाकारणे हे म्हणजे वारकरी परंपरेच्या विरोधातील भूमिका. साने गुरुजींची भूमिका महाराष्ट्राच्या समाजमनाने उचलून धरली. विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व भावा-बहिणींसाठी खुले झाले. देशाचे स्वातंत्र्य वेशीवर आलेले असताना साने गुरुजींचे हे उपोषण नव्या भारतासाठी दिशा दिग्दर्शक होते. येऊ घातलेल्या भारतीय संविधानातील सामाजिक समतेच्या मुल्याच जमीनीवरील ते प्रात्यक्षिक होत. आज साने गुरुजींची आठवण काढताना मनात अनेक प्रश्न आहेत. एकविसाव्या शतकात मंदिरप्रवेशाचा मुद्दा अप्रस्तुत ठरलाय. पण अन्यायकारी व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या जातीव्यवस्थेचा मुद्दा तर कायम आहे. सरकारे बदलली तरी जातीय अत्याचार सुरुच रहातात. जातीअंताची लढाई आज वेगळ्या टप्प्यावर नेण्याची गरज आहे. जातीय अत्याचार व महिला अत्याचाराच्या घटनातील गुन्हेगारांना वेळेत कठोर शासन करुन कायद्याच्या राज्याचा वचक निर्माण करण्याची गरज वाढलीय. समाजात सामाजिक सलोखा हवाय तो अशा अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी, त्यावर पांघरूण घालण्यासाठी नाही. सर्वांना चांगल्या शिक्षणाचा व सक्षम रोजगाराचा अधिकार मिळावा, उपजिवीकेच्या साधनांच्यापर्यंत सर्वांची पोहोच वाढावी या आघाड्यावर सामाजिक समतेची लढाई ताकदीने लढण्याची गरज आजही तितकीच तीव्र आहे.
            साने गुरुजी मातृह्रदयी होते. भावनाशील होते. आणि त्याचबरोबर लढवय्ये सुद्धा होते. खरे तर ज्याच्या मनातील संवेदनशीलता जागी आहे आणि ज्याच्या काळजातील भावना अद्याप थिजलेल्या नसतात अशी माणसेच नवनिर्माणकारी संघर्षात स्वतःला झोकून देवू शकतात. आज ११ जूनला साने गुरुजींच्या स्मृतीदिनी
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे
अस सांगत वैश्विक प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींची आठवण तर काढुयाच आणि त्याचबरोबर शेतकरी, कामगार आणि शोषित जातीसमुहांच्या न्याय्य अधिकारांसाठी ठोस कृती करणाऱ्या, निर्धाराने संघर्ष करणाऱ्या लढवय्या साने गुरुजींनाही अभिवादन करुया....

================================
                   कशी येते मॅच्युरिटी
                  "परिपक्व व्यक्तिमत्व"

*१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*२) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*३) माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*४) प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.*

*५) प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*६) माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*७) माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*८) माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*९) माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*१०) माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*११) माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*

*१२) माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे !

================================


✅      👯👯👯👯👯👯👯
*...   तर थकवा येणारच!*

साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. *ताक करताना रवी* वापरली जात असे, *पाटा-वरवंटा* रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूटासाठी *खलबत्ता* सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण *आहाराचा दर्जा उत्तम* होता.

गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की *तांब्या-पितळेची भांडी* असायची. खाली *मांडी घालून जेवायला बसत असत*. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. *चणे,फुटाणे शेंगदाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं*. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही.  *कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती*. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात?

*कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत*. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. माणसं शक्यतो *पायी चालत, सायकल वापरत*. शाळेचा प्रवास पायी असायचा. सकाळ-संध्याकाळ *ग्लासभर दूध* प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, *तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी असायचेच*.

जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर *पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स* पाहत पाहत ! रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत.

या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. *एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता*. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही ! आयुष्यं आता इतक गतिमान नव्हत, पुष्कळ संथ होत. पण, त्यामुळं थकवा नव्हता.  *“लवकर निघा*, *सावकाश जा, सुरक्षित पोहोचा”* हे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं.  राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं. आज आपल आयुष्यं नुसत धावपळ करण्यातच जातय..!

लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. *हेवेदावे, रूसवेफुगवे होते,* पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. *दारांना कुलुपं नव्हती*. *शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच*. त्यात प्रेमही होतं आणि रितही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. *भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं.* धीर वाटायचा.

आज *प्रायव्हसीच्या* नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, *तर थकवा जाणवतोय ना थकवा,, मग काळजी घ्या

================================

"स्मशानातील सोनं.." इ. १०वी मध्ये हा धडा कोणी-कोणी वाचलाय  आठवतो का ? 
----------------------------------
शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमान ताडकन उङी मारली.त्याला समाधानाचं भरत आलं.आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला.त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनी प्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षात होता. वारा मंद वाहत होता.त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली तीस-पन्नास झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरात मानसं राहात होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांव छाया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली मानसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोर खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचार मग्न बसला होता.त्याच्या हृदयात भयंकर हुरहूर उठली होती.त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती.त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुनः पुनः सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता.त्याला आता अंधाराची गरज होती.म्हणून तो चुळबुळत होता.त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडान जबरा होता. तो भर पहिलवाना सारखादिसे. त्याचं प्रचंड मस्तक,रुंद गर्दन,दाट भुवया,पल्लेदार मिशा,रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हूडहुडीच भरत असे. भीमाच गाव दूर वारणेच्या काठी होत. पण रेड्याच बळ असूनही गावी पोट भरत नाही.म्हणून तो मुंबईला आला होता.मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती.पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात, जंगलात आला होता.मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत.यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरा जवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होत. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता.तो आपलं रेड्याच बल घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता. त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते.त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता; कारण त्याला पगार मिळत होता. परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुरहाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले कि आजपासून हि खाण बंद झाली,आपलं काम सुटलं हि वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली.क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय हा एकाच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनःस्थितीत तो घराकडे फिरला.तो त्याची नजर एका राखेच्या ढिगा-यावर स्थिरावली. ती राख मढ्याची होती.जळकी हाडं सर्वत्र पसरली होती.त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला.एखादं बेकार असेल बिचारे, कंटाळूनच मेलं असेल.सुटलं असेल एकदाच - असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार! दोनच दिवसात उपासमार सुरु; मग नाबदा रडत बसेल.बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला.त्याने वाकून, निरखून पाहिलं.तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती.ती चटकन उचलून भीमान करकरून मुठ दाबली.त्यालाआनंद झाला. एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला.मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला.जगण्याचा नवा मार्ग सापडला. आणि दुस-याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंङु लागला.नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळणीन चाळू लागला. आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला.बाळी, मुदी, नथ,पुतळी,वाळा,असे काही न काही घेऊन रोज येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरु होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता.अग्नीच्या दाबान प्रेताच्या अंगावरच सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला.जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी.कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई.त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता.त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते..त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते.ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंताने आणि जगावं तर श्रीमंताने गरिबांन मरू नये असा त्याचा दावा होता.अवमानित पामराला जगण्याचा नि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजा-यांना दरडावून सांगत होता.जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो.असं त्याच मत होत. बेकारीच्या उग्रतेन त्याला उग्र केलं होत.तो रात्रंदिवस मसणवटी धुंडाळीत होता.मढ हे त्याच्या जीवनच साधनं झालं होत.त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होत. त्याचं दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते.पुरलेली मढी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडले होते.आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते.अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवल वाटत होत.कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खात पाळतीवर होत. पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं. सूर्य मावळला.सर्वत्र अंधार पसरला.भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं.तेव्हा तो गंभीर होऊन जेऊ लागला.आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली ,"आज कुठं जाणार वाटतं ?मला वाटतं हे काम नको आम्हाला.कुठंतरी दुसरं काम करा. मढ, मढ्याची राख , सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे लोक नावं ठेवतात." "तू बोलू नको ."तिचं बोलणं एकूण भिमाचं मन दुखावलं.तो चिडक्या स्वरात म्हणाला."मी काहीही करीन.त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का?" "तसं नव्हे -"नव-याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, "भुतासारखं हे हिंडणं चांगलं नाही.मला भीती वाटते म्हणून म्हणते." "मसणवट्यात भुतं असतात असं तुला कोणी सांगितलं ?अग ,हि मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरीभुतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवट्यात कुजतात भूतांची पैदास गावात होते - रानात नाही." भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकूण ती गप्प झाली आणि भीमान निघण्याची तयारी केली तू गुरकून म्हणाला, " मुंबई चाळून मला काम मिळालं नाही.पण मढ्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला.पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते -" असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निःशब्द शांतता नांदत होती नि भीमा निघाला होता. भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती.वर पोत्याची खोळ घेतली होती.आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता.त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती.सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार करीत होता.आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं,मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं.एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड घुत्कार करून भेसूरतेत भर घालीत होतं.त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला.त्यानं खाली बसून दूर पाहिलं.गावात सामसूम झाली होती अधून मधून कोणीतरी खाकरत होतं,एखादा दिवा डोळे मिचकावीत होता.परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला.प्रत्येक ढेपनिपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला.एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच कला झाला होता;पण एकाएकी वीज उठली होती.ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता. त्यामुळे भीमा घाबरला होता.पाऊस पडला कि, नवी गोर सापडणार नाही,याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करीत होता. त्याला घाम फुटला होता नि तो भान हरपला होता. मध्यानरात्री पर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होता. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या.जणू कोणीतरी दातचं खात असावं, तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गरगुर उठत होती.कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं.त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला; परंतु तोच कुणीतरी हात पाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडेधावली.आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला. परंतु दुस-याच क्षणी त्यानं स्वतः ला सावरलं.खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःचं खजील झाला. कारण जवळचं ती नवी गोर होती.आणि दहा पंधरा कोळी जमून तिला चौफेर उकरीत उकरीतहोती.त्यां
ना मेलेल्या माणसाचा वास लागला होता.गोरीवरचे दगड तसेच ठेऊन दुरूनच त्यांनी घळी पडायला आरंभ केला होता. आजु बाजूनं गोर उध्वस्त करण्याचं काम ती करीत होती; परंतु पुनः त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्या जवळ कोण जाणार या इर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती.पुनःनाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्वशक्ती एकवटून माती ओढीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला.त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला.लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली.चमकली नि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवाराची माती काढू लागला. आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पहिला. एक कोल्हा पिसाट होऊन भिमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला.अंगावरच पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली तो कोल्हा पुनः भीमावर धावला नि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला.कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला.झपाट्यानं कोल्हा गारद झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला नि रणधुमाळी सुरु झाली.पुनःभीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते; पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरवात केली होती. चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारीत होता. कोल्हे तीरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं.कुंतीपुत्र भीमाच नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्हयांशी लढत होता.उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी, आपली सर्वशक्ती पणाला लावून लढत होता.पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारूण रण पेटलं होतं. सुर्ष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती.तो गाव निपचित पडला होता. आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नि मढ्यासाठी झटापटिला जोर चढला होता.भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता.कोळीत्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती, किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती.भीमा लचका तुटताच विवळत होता.शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारलेहोते. कितीतरी उशीराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला.अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली. आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला.आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुनः कोळी तुटून पडली नि पुनः हाणामारीला सुरवात झाली;परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली त्यांनी आपला पराजय काबुल केला. आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं.मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताठलेलं मढ त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं.त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पहिला.एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली कि प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली;पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली.एका बाजून ती पहार जबड्यात घालून दुसर्या बाजून त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली.सर्वांनी हुकी देऊन पळ काढला.पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. " आरं कोळ्यांनी प्रेत खाल्लं, चला "असं कुणीतरी ओरडलं नि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुनः डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पहिले आणि - बोटं काढून नंतर पहार काढण्या ऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली घटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली.आडकित्यात सुपारी सापडावी तशी सापडली.भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली. आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन मानसं येत असलेली दिसली.तसा भीमा भयभीत झाला.त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताच राग आला. त्याच्याकडे येणारी मानसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले. आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले.त्याच्या अंगात मुंग्या उठल्या.हेच खरं भुत हे आपणाला पकडून देणार,लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील. नाही तर मारमारून पोलिसांच्या हवाली करतील. असं वाटून भीमा आगतिक झाला. वैतागला निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. ' भडव्या, सोडमला.' तो जोरानं ओरडला. गावकरी जवळ होते भीमा अडकला होता.मग त्यानं विचा विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती, फक्त चामाडीला चिकटून लोंबत होती.ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरु झाली. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली. आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुनः सुरु झाल्याची बातमी आली.ती ऐकून हत्तीसारखा भीमालहान मुलाप्रमाणे रडू लागला.कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.

लेखक :आण्णा भाऊ साठे

================================


हो, हत्ती जलसमाधी घेतात. – मारुती चित्तमपल्ली

हत्तींच्या बाबतीत एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो *म्हातारा हत्ती* नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही. आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात.

*हत्तींच्या कळपाचं नियंत्रण हत्तीण करते*. कळपातले इतर तिच्या मागे चालतात.

*काळविटांच्या कळपाचं नियंत्रणसुद्धा मादी काळवीटच करते*. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानाने देते. कानाची पाळ ती उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो.

आपण म्हणतो कोकिळा गाते, पण *मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो*. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याचजणांना माहिती नाही. *लता मंगेशकर यांना आपण ‘गानकोकिळे’ची उपाधी देतो, ते चुकीचं आहे.*

सर्वसामान्यांकरिता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे; परंतु या ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातील प्राण्यांबाबत वस्तुस्थिती आहे.

– मारुती चितमपल्ली यांनी एकूण ६५ वर्षे जंगलात काढली.. हे मराठी वन्यजीव अभ्यासक, पक्षितज्ज्ञ व निर्सग लेखक आहेत. वनाधिकारी म्हणून ३६ वर्षे नोकरी.
             


No comments:

Post a Comment

श्री मौनी महाराज हायस्कूल पाटगांव ">